‘मी असताना कोणी देखील आरक्षण हटवू शकत नाही’, रामदास आठवलेंचा इशारा

पोलीसनामा ऑनलाइन – तामिळनाडू सरकारच्या कायद्यानुसार केंद्र सरकारने इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांत ५० टक्के आरक्षण नाकारले होते. केंद्राच्या या निर्णयाविरोधात तामिळनाडूतील राजकीय पक्षांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निरीक्षण नोंदविताना सर्वोच्च न्यायालयाने, ‘आरक्षण हा काही मूलभूत अधिकार नाही’ असं म्हणत सादर केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या. त्यानंतर देशात सर्वत्र या विषयावरती चर्चा सुरु झाली. सोशल मीडियात यावरती वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले, तसेच आरक्षण रद्द करण्याविषयी अफवाही पसरवल्या जात आहे. या सगळ्यावरती आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

आरक्षण हटवण्याबाबत खोट्या अफवा सोशल मीडियात पसरवल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवरती अफवा पसरवणाऱ्यांना रामदास आठवले यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “देशाच्या संविधानाने दिलेलं आरक्षण मी असताना कोणीही हटवू शकणार नाही. आरक्षण कायम सुरु ठेवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आरक्षण हटवलं जाणार असल्याचा खोटा प्रचार सोशल मीडियातून करणारे लोक निश्चितच आरक्षण विरोधी असल्याचं दिसून आहे” असं ते म्हणाले.

आरक्षण असावं की नसावं हा मुद्दा सातत्यानं चर्चेत असलेला दिसून येतो. मागील काही दिवसांपासून हा विषय चर्चेत असून, आरक्षण हटवणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावरती पसरवल्या जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय जागात तामिळनाडूच्या वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या कोट्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.