रितेश देशमुखनं शेअर केला अनोळखी दिव्यांग व्यक्तीला मदत करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ ! म्हणाला… (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार रितेश देशमुख सोशलवर कायमच सक्रिय असतो. आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं तो अनेकदा चर्चेतही येत असतो. अलीकडेच त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळं तो चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ एका महिलेचा आहे जी दिव्यांग व्यक्तीला मदत करत आहे. रितेशनं नुकताच त्याच्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक महिला एका अनोळखी दिव्यांग व्यक्तीला बसपर्यंत जाण्यासाठी मदत करते. इतकंच नाही तर ती धावत बसकडे जाऊन कदाचित बस सोडू नका असं सांगत आहे असंही दिसत आहे. नंतर ती त्या दिव्यांगाला बसमध्ये बसवते.

व्हिडीओ शेअर करताना रितेश म्हणतो, “आपणही या महिलेसारखंच मदत करायला शिकलं पाहिजे. तेही आपल्याला कोणी पहात नसतानादेखील.” रितेशनं तिचं कौतुक केलं आहे. रितेशला असं सुचवायचं आहे की, काही लोक दाखवण्यासाठीही इतरांची मदत करतात. परंतु जेव्हा आपल्या आजू बाजूला पाहणारं कोणी नसेल तर तेव्हाही आपण अशीच मदत करायला हवी.

रितेशचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी यावर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अजूनही व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्या सोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. 6 मार्च 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसला परंतु कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं थिएटर बंद करण्यात आले आणि सिनेमाच्या कमाईला मध्येच ब्रेक लागला.