जिंकण्याची साशंकता असल्याने पवारांनी माढ्यातून माघार घेतली : नितीन गडकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमिवर राज्यात आणि देशात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले विचार व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली, आघाडीबाबत मनसेची भूमिका, अशा विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची साशंकता असल्याने शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी, असं सूचक वक्तव्य नितीन गडकरींनी केले. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या विचारांमध्ये ताळमेळ नाही. त्यामुळे विचारांच्या आधारावर युती करावी, राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती, असं मत त्यांनी व्यक्त केले.

नागपूरच्या जनतेने सेवेची संधी दिली, आजपर्यंत नागपूरचा विकास, भविष्यासाठी काम केलं. जे जगात नाही ते नागपुरात करण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं. तर नागपूर मेट्रोसारखी जगात कुठेही नाही. मी जात, पंथ, भाषा आणि पक्ष पाहून काम केलं नाही आणि करणारही नाही. गरिबांच्या विकासासाठी राजकारण करेन, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, बाळासाहेबांचे पुत्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून माझं उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंबींयावर प्रेम आहेच. तसंच गडकरींनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत ते राज्य उत्तम चालवत आहेत, असं म्हटलं.