रोहित पवारांनी नीट अभ्यास करुन बोलावं, LBT वरून विरोधकांचा खोचक ‘टोला’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने घाईघाईने एलबीटी रद्द केल्यामुळे राज्याचं नुकसान झालं असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला आहे. रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. त्यांनी नीट अभ्यास करून बोललं पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या जीएसटीच्या परताव्यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अलीकडेच झालेल्या एका बैठकीत अजित पवारांनी जीएसटीवरुन केंद्र सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी देखील भाजपवर टीका केली होती. भाजपवाल्यांना खरंच महाराष्ट्रातील जनतेबद्दल कळवळा असता तर केंद्राकडे अडकलेले जीएसटीचे पैसे त्यांनी मागितले असते, असे म्हणत रोहित पवार यांनी आरोप केले होते. त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी टोला लगावला आहे.

खोटं बोल पण रेटून बोल
जीएसटी संबंधीत बैठकीत अजित पवार काय बोलले आणि त्यातून अर्थ काय काढले गेले यात फरक आहे. मी यासाठी अजितदादांना दोष देणार नाही. पण केंद्र जीएसटीचे पैसे देत नाही अशी ओरड सातत्याने केली जातेय. खोटं बोल पण रेटून बोल अशी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कामाची पद्धत असल्याचे फडणवीस म्हणाले.

आताची मागणी मार्च नंतरच्या GST ची
खरंतर, केंद्र सरकारने राज्यांना देणे असलेले मागील वर्षाचे म्हणजे मार्च 2020 पर्यंतचे 19 हजार 500 कोटी रुपये आधीच दिले आहेत. साथ रोग कायद्याच्या नावाखाली केंद्र सरकार ते नाकारूही शकलं असतं. पण केंद्राने तसं केलेलं नाही. आताची जी मागणी होतेय, ती मार्चनंतरच्या जीएसटीची आहे. त्याबाबतही केंद्राने मदतीची भूमिका घेतली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही
रोहित पवारांच्या आरोपाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, रोहित पवार यांना कॅलक्युलेशन समजत नाही. जीएसटीचे जे कॅलक्युलेशन आहे ते बेसच्या वर 14 टक्के असं आहे. पण आपल्याला 2017-18 मध्येच बेसच्यावर जीएसटी मिळाली आहे. त्यामुळे एलबीटी असता तरी हे मिळाले नसले. एलबीटीची मागणी आपण कौन्सिलसमोर ठेवली होती. पण ती मान्य केली गेली नाही. उगाच काहीतरी आकडे सांगायचे. एवढे मिळाले पाहिजे, तेवढे मिळाले पाहिजे, असं म्हणायचं. रोहित पवारांनी नीट अभ्यास केला पाहिजे आणि बोललं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.