‘देवेंद्र फडणवीस यांना साखर उद्योगाची आठवण झाली याचे समाधान’

कोल्हापूर, पोलीसनामा ऑनलाईन: साखर उद्योगाची आठवण  देवेंद्र फडणवीस यांना झाल्याचे पाहून समाधान वाटले, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावत ते म्हणाले, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यामुळे साखर उद्योगातील लाखो कुटुंबीयांना आजपर्यंत स्थैर्य मिळाले आहेे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शेतकरी आणि साखर उद्योगांच्या प्रतिनिधींना घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या भेटीत साखर व्यवसायाला भेडसावणार्‍या अनेक प्रश्नांवर चर्चा केली. त्यात बफरस्टॉकची मुदत जुलै 2020 असून ती वाढवणे, साखरेचे एक्सपोर्ट धोरण ठरवणे, एक्सपोर्ट अनुदान व बफर स्टॉकचे व्याज कारखान्याना तात्काळ देणे, कारखान्यांना तोटा भरून काढण्यासाठी प्रतिटन 600 रुपये अनुदान देणे, इथेनॉलचे दीर्घकालीन धोरण ठरवून आर्थिक मदत करणे तसेच कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन करणे, या सारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.  ’साखर उद्योगावर लाखो ऊस उत्पादक, लाखो कामगार, शेतकर्‍यांसह देशाचे, राज्याचे अर्थकारण आणि लाखो कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार शेतकर्‍यांच्या ऊसासह इतर सर्वच पिकासाठी मेहनत घेऊन या वयातही त्यांचे हे काम सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना याची आता जाणीव निश्चित झाली असेल,’ असेही मुश्रीफ म्हणाले.

मुश्रीफ यांच्याकडून साखरेच्या दरवाढीचे स्वागत
साखरेच्या दरामध्ये प्रति किलो दोन रुपयांनी वाढ करणार आहे, याचे मुश्रीफ यांनी स्वागत केले. या निर्णयामुळे आता प्रति क्विंंटल 3100 रुपये असलेला साखरेचा दर प्रति क्विंटल दर 3300 रुपये होणार, हे स्वागतार्ह आहे. असे तरी हा दर 3500 प्रति क्विंटल असणे गरजेचे होते. साखर कारखाने प्रति टनामागे 400 ते 450 रुपये तोटा सहन करत आहेत. अतिरिक्त कर्ज आणि व्याजामुळे कारखानदार घायकुतीला आलेत. साखर दरवाढीची अंमलबजावणी एक ऑक्टोबरपासून होणार असल्याने याचा व्यापार्‍यांचा फायदा होणार आहे.

ऑक्टोबरपर्यंत कारखान्यांना आपला साखरेचा कोटा विकावा लागणार आहे. कारण त्यांना तोडणी, वाहतूक, कारखान्याची मेन्टेनन्सची कामेही गरजेची आहेत. साखर नाही विकली तर व्याजाचा भुर्दंड आहे. वरील खर्चासाठी कारखान्यांना साखर 3100 रुपयेने विकावी लागणार असून व्यापारी ती घेतील. आणि एक ऑक्टोबरपासून विकतील. त्यामुळे त्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय जाहीर केला की काय? असा प्रश्न देखील हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा म्हणजे ‘मिशन महाराष्ट्र’ नाही ना?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या भेट कशासाठी असेल? नेमके काय कारण असणार त्यांच्या दिल्ली दौर्‍याचे? अशा अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातील अनेकांना पडत होते. कदाचित मध्यप्रदेशनंतर भाजपने राजस्थानकडे आपला मोर्चा वळवून तेथील सरकार पाडण्याचा डाव आखला होता. मात्र, तो डाव यशस्वी झाला नाही. त्यामुळे भाजपने आता ‘मिशन महाराष्ट्र’ केले आहे का? असाही प्रश्न अनेकांना पडत होता. सध्या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे त्यांच्यात कायम धूसफूस राहणार आहे. याचाच डाव साधून पक्ष फोडणीसाठी राजकीय रणनिती भाजप करणार नाही ना? अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौर्‍याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी भेटीत कोणती चर्चा केली आहे? कोणती नाही? काय मुद्दे असतील? कोणते मुद्दे नसतील? याचा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जात आहे. फडणवीस यांनी भेटीत अनेक मुद्द्यावर चर्चा केली असली तर सर्वच मुद्दे सांगतील की नाही?याचाच अंदाज आता लावला जात आहे.