रशियाच्या ‘कोरोना’ वॅक्सीनचं सत्य आलं समोर, फक्त 38 जणांवर झाली टेस्ट, अनेक साईड इफेक्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यशस्वी ठरवलेल्या कोरोना लसीची चाचणी केवळ ३८ लोकांवर घेण्यात आली होती. रशियाच्या अधिकृत कागदपत्रांच्या संदर्भातून हे उघड झाले आहे. त्याचबरोबर लसीच्या अनेक दुष्परिणामांची माहितीही समोर आली आहे. अहवालानुसार, केवळ ३८ जणांवरील चाचणीनंतर लस मंजूर झाली. एका वृत्तसंस्थेनुसार, रशियाच्या कोरोना लसीचा दुष्परिणाम म्हणून वेदना, सूज, उच्च ताप आढळले आहे. त्याचबरोबर कमकुवतपणा, ऊर्जेची कमी, भूक न लागणे, डोकेदुखी, अतिसार, नाक बंद होणे, घसा खवखवणे आणि नाक वाहने यासारख्या तक्रारीही नोंदवल्या गेल्या आहेत. अहवालात दावा करण्यात आला आहे की, रशियन अधिकाऱ्यांनी अवघ्या ४२ दिवसांच्या संशोधनानंतर लसीला मान्यता दिली.

या कारणास्तव, लस किती प्रभावी आहे हे समजू शकले नाही. लसीच्या नोंदणीसाठी दिलेल्या कागदपत्रांमध्ये असे लिहिले होते की, महामारीबाबत लसीच्या प्रभावाचा कोणताही नैदानिक अभ्यास झालेला नाही. मात्र पुतीन यांनी सांगितले होते की, लसीने सर्व आवश्यक चाचण्या पार केल्या आहेत. रशियाने आपल्या कोरोना लसीचे नाव Sputnik V ठेवले आहे आणि बर्‍याच देशांमध्ये पुरवठा करण्याची तयारी देखील करत आहे. मात्र जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी रशियाच्या या पावलावर जोरदार टीका केली आहे. शास्त्रज्ञांना भीती आहे की, लस चुकीची किंवा धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्यास महामारी आणखी भयानक रूप धारण करू शकते. पुतीन म्हणाले होते की, लस लावल्यानंतर त्यांच्या मुलीला थोडा वेळ ताप आला होता. पण एका वृत्तसंस्थेनुसार, लसीचे दुष्परिणाम म्हणून अनेक समस्या असतात.

या समस्या व्यक्तीच्या शरीरात पुनरावृत्तीही करतात आणि बर्‍याचदा दीर्घकाळ राहतात. अहवालानुसार, लसीचे बहुतेक दुष्परिणाम आपोआप बरे झाले, पण अभ्यासाच्या ४२ व्या दिवशीही दुष्परिणामांची ३१ प्रकरणे दिसून आली होती. अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, लस लावल्यानंतर ४२ व्या दिवशी स्वयंसेवकांच्या शरीरात अँटीबॉडीजचे प्रमाण सरासरी पातळीपेक्षा कमीच होते. त्याच वेळी, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना रशियन लस लावण्याची परवानगी दिली गेली नाही. कारण अशा लोकांवर काय परिणाम होईल हे माहित नाही.गर्भवती व मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांनाही लस दिली जाणार नाही. आधीच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनाही अतिरिक्त दक्षतेसह लस लावण्यास सांगितले गेले आहे.