Coronavirus Vaccine: रशियानं सर्वसामान्यांसाठी बाजारात आणली ‘कोरोना’ची लस, भारतासाठी चांगली बातमी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूची लस बनवण्यासाठी बर्‍याच देशांचे शास्त्रज्ञ रात्रंदिवस काम करत आहेत. दरम्यान, रशियामधून एक चांगली बातमी समोर येत आहे. रशियाची कोरोना विषाणूची लस स्पुतनिक व्ही सामान्य नागरिकांना देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात रशियाने ही लस मंजूर केली होती, त्यानंतर जगभरात, विशेषत: पाश्चात्य देशांमध्ये याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की लवकरच लसीचे वितरण प्रादेशिक आधारावर सुरू केले जाईल. स्पुतनिक-व्ही गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांनी विकसित केली आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘स्पुतनिक व्ही लसच्या पहिल्या बॅचने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय उपकरणाच्या नियामकांची आवश्यक गुणवत्ता चाचणी पार केली आहे आणि पहिली बॅच सिव्हिल सर्क्युलेशनमध्ये जारी करण्यात आली आहे.’

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने 11 ऑगस्ट रोजी कोविड-19 ची प्रथम लस नोंदविली होती. अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वत: कोरोना लस तयार करण्याची घोषणा केली. या लसीचे नाव स्पुतनिक व्ही ठेवण्यात आले. मॉस्कोचे मेयर सेर्गेई सोबयानिन यांनी रविवारी अशी आशा व्यक्त केली की रशियन राजधानीतील बहुतेक रहिवाशांना काही महिन्यांत कोरोनो विषाणूची लस दिली जाईल. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रशिया लवकरच देशाच्या इतर भागात लसीची पहिली बॅच पुरवण्याच्या विचारात आहे.

भारतासाठी चांगली बातमी

या महिन्यात भारतासह अनेक देशांमध्ये रशियन लसीची क्लिनिकल चाचणी सुरू होणार आहे. या महिन्यात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फिलिपिन्स, भारत आणि ब्राझील येथे क्लिनिकल चाचण्या सुरू होतील असे रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रेव यांनी सांगितले. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा प्राथमिक परिणाम ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये प्रकाशित केला जाईल.