COVID-19 : अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन यांना मागे टाकून रशियाने बनवली ‘कोरोना’ची लस, ‘या’ विद्यापीठाने केला दावा

पोलिसनामा ऑनलाईन : संपूर्ण जगाला करोना विषाणूने हैराण करुन सोडले आहे. या विषाणूचा फैलाव रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात अधिक प्रमाणावर संशोधन सुरु आहे. यात सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे आढळत आहे.

रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना विषाणूवर बनवलेली लस सर्व वैद्यकीय चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. विद्यापीठानेच तसा दावा देखील केला आहे. या लसीमुळे करोनाचा फैलाव रोखण्यास मदत होईल.

रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोनावर लस बनवली आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा असून स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल.

दुसऱ्या गटाला २० जुलैला डिस्चार्ज दिला जाणार आहे, असे वादिम तारासोव्ह यांनी सांगितले. ते इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक आहेत. एएनआयने हे वृत्त दिले असून रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या वैद्यकीय चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने १८ जून रोजीच सुरु केल्या होत्या.

“करोनाविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लसीच्या स्वयंसेवकांवरील चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत” असे तारासोव्ह यांनी सांगितले. रशियन विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला तर करोनाला रोखणारी जगातील पहिली लस ठरेल.

सध्या अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांमध्ये करोनाला रोखणारी लस विकसित करण्यासाठी अधिक प्रमाणावर संशोधन सुरु असून त्यांच्यात स्पर्धा सुद्धा आहे. मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे, हाच या चाचणी मागचा मुख्य हेतू होता आणि तो साध्य झाला आहे, असे अलेक्झँडर लुकाशेव यांनी सांगितले आहे. करोना विरोधात वापरण्याससाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असे लुकाशेव यांनी स्पुटनिकला सांगितले. करोनावर प्रभावी लस बनवण्यासाठी जगभरात १२० पेक्षा जास्त प्रकल्प सुरु आहेत.