राजू शेट्टी सरड्यासारखे रंग बदलणारे, सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राजकारणात राजू शेट्टींप्रमाणे मला सरड्यासारखे रंग बदलता येत नाहीत, अशा शब्दात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आम्ही फालतू माणसे होतो, पण आमच्यासारख्या फालतू माणसांमुळेच तुमची संघटना मोठी झाली. तुम्ही आमदार, खासदार झालात हे विसरलात काय, असा टोलाही खोत यांनी लगावला आहे.

दूध दरावरून सोलापूरमध्ये राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला खोत यांनी पलटवार केला आहे. इस्लामपूरमध्ये आमदार फंडातून सुरू झालेल्या पहिले फिरते क्वारंटाईन सेंटरचे उद्घाटन त्यांनी केले. दरम्यान, दूध दरावरून महायुती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलना दरम्यान सोलापूर येथे शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर भंपक आणि फालतू माणसासोबत पुन्हा काम करणार नाही, अशा शब्दात टीका केली होती.

या टीकेला उत्तर देताना खोत यांनी शेट्टीवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोनामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांना निकृष्ट बियाणे मिळाले, दुधाला दर नाही, शिवाय शेतकर्‍यांना सरासरी 34 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. आता शेतकर्‍यांच्या या सार्‍या प्रश्नावर सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. महायुतीही आंदोलन करत आहे. तर शेतकरी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना पण शेतकर्‍यांसाठी आंदोलन करत आली आहे.