15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील 180 साखर कारखाने सुरु होणार : बाळासाहेब पाटील

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्यात यंदा ऊस लागवड क्षेत्र वाढल्याने साखर गळीत हंगाम 15 ऑक्टोबरच्या आसपास सुरू करण्याचे नियोजन साखर आयुक्तालयाने आखले आहे. राज्यात साधारणपणे 180 साखर कारखाने सुरू होणार असून 800 लाख मेट्रिक टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या फैलाव होत असल्यामुळे ऊसतोड कामगारांचा तुटवडा भासणार आहे. मात्र, ऊसतोड कामगार कमी पडल्यास हार्व्हेस्टर वापरणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरूवारी पुण्यात साखर कारखाने सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेतली. त्यात यंदा किमान 180 साखर कारखाने चालू करण्यासंबंधीचं नियोजन तयार केले आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आला नाही तर ऊसतोड मजूरांच्या सुरक्षेचं काय ? मुळात मजूरच कोरोनामुळे ऊसाच्या फडावर आले नाही. तर हार्व्हेस्टर आणि स्थानिक मजुरांच्या सहाय्याने ऊसतोड केली जाईल, असेही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, 15 ऑक्टोबरपासून राज्यात कारखाने सुरू करण्याचे नियोजन आहे. यात जास्त सहकारी कारखाने सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे यात स्थानिक कामगारांना प्राधान्य दिले जाणार आहे. कोरोनाच्या आडून रहिवाशांची अडवणूक करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटी चेअरमन आणि सेक्रेटरीवर यापुढे आणखी कठोर कारवाई करावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्यात सध्या 3 ते 4 सहकारी सोसायट्यांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच अनेक तक्रारी येत असल्याचेही बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.