नेतृत्वावरून छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावाल तर याद राखा !, संभाजीराजे भोसले यांचा इशारा

पोलिसनामा ऑनलाईन – मराठा समाजाचे नेतृत्व कोणीही करावे. आपण समाजाचा सेवक म्हणून काम करत आहोत. छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावण्याचे उद्योग कोणी करत असेल तर त्याच्या नांग्या ठेचाव्या लागतील, असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या नेतृत्वावरून वाद निर्माण करणार्‍यांना दिला आहे.

सकल मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक काल नाशिक येथे झाली. मराठा समाजाचे नेतृत्व कोणी करावे यावरून काही घटकांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. हा धागा पकडून संभाजी राजे यांनी सातारा आणि कोल्हापूरची गादी एकच असल्याचे नमूद केले. बैठकीस आपण राजकारणी म्हणून नव्हे तर, मराठा म्हणून आलो आहोत. आपण मराठाच नव्हे तर, बहुजन समाजासाठी काम करतो. अठरापगड बारा बलुतेदारांचे स्वराज्य निर्माण केलेल्या छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून या वारशाला धक्का लागेल, असे कृत्य आपण करणार नाही. त्यामुळे नेतृत्वावरून छत्रपतींच्या घराण्यात भांडणे लावाल तर खबरदार असा इशारा राजेंनी उपस्थितांना दिला आहे.