सांगलीत MBBS विद्यार्थ्यानं केला तरुणीवर बलात्कार, नराधम अटकेत

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने तरुणीवर बलात्कार कल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा विद्यार्थी सांगलीमधील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार रविवारी (दि.5) रात्री उघडकीस आला आहे. आरोपीने तरुणीसोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. यानंतर लग्नास नकार दिला.

याप्रकरणी पीडित तरुणीने आरोपी पृथ्वीराज पाटील (रा. निंबवडे, ता. आटपाडी) याच्या विरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पृथ्वीराज पाटील याला रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज हा शहरातील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घेत आहे. याच महाविद्यालयात नर्सिंग विभागात तक्रारदार पीडित तरुणी शिकते.

या दोघांमध्ये ओळख झाल्यानंतर पाटील याने पीडित तरुणीसोबत जवळीक साधली. कालांतराने या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पाटील याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. पाटील याने विश्रामबाग परिसरात तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीला अपत्यही झाले. त्यानंतर तिने पाटील याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्याने तरुणीशी संपर्क तोडले. फसवणूक आणि लैंगिक अत्याचार झाल्याने पीडित तरुणीने रविवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पृथ्वीराज पाटील याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.