केंद्र सरकारकडून महिलांसाठी गिफ्ट ! आता फक्त 1 रूपयांमध्ये मिळणार सॅनिटरी नॅपकिन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधानांच्या घोषणेनंतर, आता भारतात सर्व जन औषधी केंद्रांवर सॅनिटरी पॅडची किंमत फक्त एक रुपया इतकी करण्यात आली आहे. 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात घोषणा केली होती की आता भारतात महिलांना सॅनिटरी पॅड 2.5 रुपयांऐवजी फक्त 1 रुपयात उपलब्ध करून देण्यात येईल.

1 रुपयात बायोडिग्रेडेबल नॅपकिन

पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनंतर आता महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सर्व जन औषधी केंद्रांवर सॅनिटरी नॅपकिनची किंमत एक रुपया केली आहे. आजपासून भारतात सर्व जन औषधी केंद्रांवर एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन खरेदी करता येणार आहेत. आत्तापर्यंत ‘सुविधा’ या नावाने जन औषधी केंद्रांवर हे नॅपकिन 2.5 रुपयात मिळत होतं पण आता त्याची किंमत कमी करून 1 रुपया करण्यात आली आहे. याआधी 4 नापकिन्सचं एक पॅकेट 10 रुपयांना मिळत होतं, आता ते पॅकेट 4 रुपयात उपलब्ध करून दिलं जाईल.

पंतप्रधानांनी केली होती घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला केलेल्या त्यांच्या भाषणात 1 रुपयात महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा केली होती. याआधी 2019 मध्ये भाजप सरकारने त्यांच्या घोषणापत्रात सांगितलं होतं त्याची आज पूर्तता होत आहे. आजपासून ‘सुविधा’ या नावाने हे सॅनिटरी नॅपकिन्स देशातील 5500 जन औषधी केंद्रांवर उपलब्ध करून दिले जातील. मागील एक वर्षात जन औषधी केंद्रांवरून 2.2 कोटी नॅपकिन विकण्यात आले, आणि आता किंमत आणखी कमी केल्यामुळे विक्री दुप्पट होण्याची शक्यता आहे.

भारतात 31.2 कोटी महिला अस्वस्थ

भारतात अशा 31.2 कोटी महिला आहेत ज्यांना मासिक पाळीदरम्यान स्वछता आणि सुरक्षा मिळत नाही. देशात सर्वात जास्त महिलांना आजार त्यांच्या अस्वच्छतेमुळे होतात. भारतात प्रत्येक 10 पैकी 9 महिलांना दर महिन्याला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे महिला घाण कापड मासिक पाळीमध्ये वापरतात त्यामुळे त्यांना अनेक आजार होण्याची शक्यता असते.