ED च्या कारवाईमुळं राज ठाकरे ‘नरम’ तर शरद पवार ‘गरम’

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडीओ असे म्हणत सभा गाजवणारे राज ठाकरे हे ईडीच्या नोटीसीनंतर नरम पडल्याचे दिसत आहे. तर शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढळून निघालं आहे. शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात स्वत: हजर राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर दोन दिवसापासून वातावरण चांगलच तापलं. या सगळ्या प्रकारामुळे राज्यात एक वेगळेच चित्र पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीनंतर पक्षाला आलेली मरगळ झटकून सगळेच नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यावरच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामना मधून आपली भूमिका मांडली आहे. आपली भूमिका मांडताना संजय राऊत यांनी शरद पवार यांचे कौतुक केले तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुनावले आहे. तसेच विरोधकांच्या नाड्या आवळण्यासाठी देशातील तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे यांचं बोलणं आणि वागणं मंदावलं पण पवार थंड पडले नाहीत तर जास्त उसळले अशा शब्दात संजय राऊत यांनी शरत पवार यांचे कौतुक केले तर राज ठाकरे यांना सुनावले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शरद पवार हे राज्यातील सगळ्यात मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या उंचीचा दुसरा नेता नाही. आज राज्यात मंत्री, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आहेत, पण नेते म्हणून पहावे असे पवार असल्याचे त्यांनी आपल्या सामनाच्या लेखात म्हटले आहे.

ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरे यांचे बोलणं बंद झाल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. दरम्यान, शनिवारी अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यनंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

Visit : Policenama.com