‘पार्थ हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीत, शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं’ : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – “शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली असेल, एखाद वक्तव्य केलं असेल तर त्यावरती फार चिंता करण्याचे कारण नाही. शरद पवारांना ओळखणं कठीण आहे. तरीही जे शरद पवार यांना ओळखतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे, पवारांचे कोणतेही विधान निरर्थक नसते. त्यांचा अनुभव, त्यांची जेष्ठता, या देशाच्या राजकारणावरील त्यांचा स्थान पाहता यामध्ये मीडियाने न पडलेले बरं” असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना पार्थ पवार यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले “पार्थ पवारांच्या भूमिकेवर मी कशाला बोलू? त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते नाहीत. त्यांचे वडील अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. पार्थ लोकसभेचे उमेदवार होते. ते पवार कुटूंबातील घटक आहेत. त्यांनी मत व्यक्त केलं. त्यावर त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना जे सांगायचं होत ते त्यांनी सांगितलं. मला वाटत तेवढ्यापुरताच तो विषय संपला. मी त्यावर मत व्यक्त होणं योग्य नाही. अनेकदा बाळासाहेबांनीही आमचे कान उपटले आहेत. पक्षाचा सर्वोच्च नेता कोणी चुकत असेल तर कान उपटतो. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” असं राऊत यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या अधिकारावर आक्रमण

शरद पवारांनी सीबीआय चौकशी करणार असेल तर विरोध करण्याचं कारण नाही असंही म्हटलं होतं. यावर विचारलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, ”त्यांनी मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करत असून क्षमेतवर २०० टक्के विश्वास असल्याचं सांगितलं आहे. गृहमंत्र्यांनीही तेच म्हटलं असून आम्हीही तेच सांगत आहोत. तपास व्यवस्थित सुरु असताना सीबीआयला आणणं आमचा विरोध आहे. हा महाराष्ट्राच्या अधिकारावर आक्रमण आहे. इथे लपवायला काहीच नाही. मुंबई पोलिसांच्या तपासा व्यतिरिक्त अजून काही सीबीआयला सापडणार नाही.”

“कायदेशीर चौकटीत असलेल्या गोष्टींना शरद पवारांचा कधीही विरोध नाही. त्यांच्या सांगण्याच्या चुकीचा अर्थ काढला जातोय. सीबीआयला विरोध असण्याचं कारणच नाही. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होऊद्या. त्यातून तुम्हाला वाटत असेल किंवा तपासाचा कोणता भाग राहिला आहे, असे वाटेल तेव्हा जगातील कोणत्याही संस्थेला तपास करु द्या” असे मत राऊत यांनी मांडले.