औरंगाबादमधील ज्येष्ठ पत्रकाराची राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी आज (रविवारी) सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली. त्यामुळे संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे. लटपटे हे पुंडलिकनगर परिसरात रहावयास होते. त्यांनी आर्थिक अडचणीतुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

लटपटे यांच्या आत्महत्येमुळे संपुर्ण मराठवाडयाच्या मीडियामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. लटपटे यांनी आत्‍तापर्यंत अनेक वर्तमान पत्रामध्ये संपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम केले होते. त्यांनी ‘एकलव्य प्रकाशन’ ची देखील सुरवात केली आणि त्याचा विस्तार राज्यभर केला होता. मात्र, या व्यवसायात नंतर तोटा झाल्यामुळे गेल्या काही वर्षापासून ते मोठया आर्थिक अडचणीत होते. त्यामधुनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, आत्महत्येपुर्वी लटपटे यांनी सुसाइड नोट लिहिली असून त्यातूनच त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.