भीषण अपघात : महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या बॉडीगार्डच्या कुटुंबातील ६ जण बंगळुरु येथे जागीच ठार

गाडी कापून काढले मृतदेह

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन – बंगळुरु येथे झालेल्या भीषण अपघातात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे अंगरक्षक आनंद देशमुख यांच्या कुटुंबातील ६ जण आणि एक चालक अशा ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. त्यांच्या कारची आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली. यात कारचा चक्काचूर झाला असून अक्षरश: कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागल्याचे समजते.

मिलिंद नारायण देशमुख (वय ४५), त्यांची पत्नी किरण मिलिंद देशमुख (वय ३५), मुलगा आदीत्य (वय १२) व अजिंक्य (वय ०७) यांच्यासह राजेश नारायण देशमुख (वय ३७), पत्नी सारिका राजेश देशमुख (वय ३१) अशा सहा जणांसह चालक जागीच ठार झाला आहे.

मिलिंद देशमुख हे भुसावळ येथील डीआरएम कार्यालयातील नियंत्रण कक्षात नोकरीस आहेत. ते राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे बॉडीगार्ड आनंद देशमुख यांचे भाऊ होते. ते मुळचे खामगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचा लहान भाऊ राजेश देशमुख हे बंगळुरु येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. ते मुलांसह आपल्या भावाकडे गेले होते. त्यावेळी सोमवारी दुपारी ते कारने फिरायला निघाले होते. त्यावेळी कारमध्ये लहान मुलांसह सहा जण होते. त्यांच्या कारला वेल्लूर जिल्ह्यातील अंबुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला. स्विफ्ट कारची एका ट्रकसोबत जोरदार धडक झाली. या धडकेत कारमधील सर्वजण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेह चक्क गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले. पोलिसांनी सातही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. याची माहिती आनंद देशमुखे यांना देण्यात आली आहे.

देशमुख कुटुंबातील २ पुरुष २ महिला आणि २ चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.