वैज्ञानिक असल्याचं सांगत तरूणीचं लैंगिक शोषण, हैदराबादच्या भामट्याला अमरावतीत अटक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – बी टेक केल्यानंतर अमेरिकेत सायंटिस्ट म्हणून नोकरी केली आहे असं सांगत एका ठगानं अमरावती शहरातील एका तरुणीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर याच भामट्यानं तरुणीची आर्थिक फसवणूक केल्याचंही उघड झालं आहे. शहरातील गाडगे नगर हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित तरूणीनं या संदर्भात पोलिसात तक्रार दिल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी शेख शुभान शेख शरीफ उर्फ शहनशाह शेख शरीफ (रा संतोषनगर, हैदराबाद, राज्य तेलंगणा) याच्या विरुद्ध लैंगिक शोषणासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

नेमंक प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं जीवनसाथी या विवाह नोंदणी वेबसाईटवर तरुणीसोबत संपर्क साधला होता. आरोपी शेख शुभान यानं आपण अविवाहित असल्याचं सांगत पीडितेला विवाहाचा प्रस्ताव दिला होता. इतकंच नाही तर आपण बी टेक करून अमेरिकेत सायंटिस्ट म्हणून नोकरी केली आहे असंही त्यानं तिला सांगितलं. तरुणीनं शेखची सर्व माहिती तपासून त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर 2 महिन्यातच शुभानचा मोबाईल हाती लागला आणि त्याचे अनेक तरुणींसोबत आक्षेपार्ह फोटो दिसले. त्यामुळं तरूणी अमरावतीला निघून गेली. यानंतर तिनं गाडगेनगर पोलिसात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

जेव्हा पोलिसांनी आरोपीची आणखी माहिती काढली तेव्हा त्यानं यापूर्वीच हैदराबाद, बंगळुरू, तमिळनाडू, अलिगढ, कोलकाता येथील 7 तरुणींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर आलीय. हैदराबादमध्ये शेख शुभान विरोधात बलात्कार आणि 7 मोबाईल चिटींगचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमरावतीमधील गाडगे नगर पोलिसांनी शेखला अटक करून त्याला न्यायालयात हजर केलं. यानंतर त्याला 29 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी तशी माहिती दिली आहे.