PM नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती पदाची नव्हे तर दिली होती ‘ही’ मोठी ऑफर : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापने दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. भाजपकडून राष्ट्रपतीपदाविषयी कुठल्याही प्रकारची ऑफर नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मला म्हणाले होते, आपण एकत्र येऊन काम केले तर त्यांना बरे वाटेल, सुप्रिया संसदेत चांगले काम करते तिलाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्याबाबत ते बोलले होते. मात्र, राष्ट्रपतीपदाविषयी कोणतीही बोलणी झाली नसल्याचे शरद पवारांनी सांगितले. तसेच याबद्दल माझ्या मनात तयारी नव्हती असे पुढे शरद पवार म्हणाले.

शरद पवार नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल सांगताना म्हणाले, महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. विदर्भातही नुकसान खूपच मोठे होते. त्यामुळे विदर्भातील नुकसानीची पाहणी दौरा केल्यानंतर मी नागपूर येथे पत्रकारांना बोलूनही दाखवले होते, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी अशी माझी भूमिका आहे. याबाबत मी पंतप्रधानांशी बोलणार आहे, असे म्हणालो होतो.

मोदी यांच्या प्रस्तावावर बोलताना मी म्हणालो, आपले वैयक्तिक संबंध चांगले आहेत. पुढेही चांगले राहतील. परंतु राजकीय दृष्ट्या एकत्र येणार आणि एकत्र काम करणे मला शक्य होणार नाही. यावर मोदी म्हणाले, आपली मतभिन्नता कुठे आहे ? शेती, उद्योग अनेक विषयांवर आपली मतं ही एक सारखी आहेत, त्यामुळे आपण एकत्र काम करावे असे मला वाटते. तर मी त्यांना म्हणालो, राजकीय विषयात विरोधासाठी विरोध करणार नाही. जेथे मला योग्य वाटेल तेथे मी त्यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करेन, असे शरद पवारांनी म्हणाले.

Visit : policenama.com