एखादा व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने पक्ष संपत नाही : शरद पवार

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांमध्ये राजीनाम्याचे आणि प्रवेशाचे सत्र सुरु झाले आहे . त्यात महत्त्वाचे म्हणजे मनसेचा एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी मनसेनला रामराम ठोकला आहे. त्यामुळे मनसेचे विधानसभेतील प्रतिनिधीत्व राहीले नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मनसेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे . त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचक वक्तव्य केले आहे. यशवतंराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

कोणताही आमदार अथवा व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने तो पक्ष संपत नसतो. मनसेची ताकद राज्यात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ही ताकद दिसेल, असं भाकीत शरद पवार यांनी केले आहे.

राज ठाकरे यांच्याकडे तरूणवर्ग आकर्षित होतो. मनसेकडे एकही आमदार नसला तरी भविष्यात मनसेची ताकद पुन्हा दिसेल आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचे आकडे वाढलेले पाहायला मिळतील, असे त्यांनी सांगितले.  त्यांनी असं सांगितल्यावर त्यांना मनसेला आघाडीत का घेतलं नाही, असा प्रश्न केला. यावर शरद पवार यांनी उत्तर देण्यास टाळले.

शरद पवार यांनी वंचित आघाडीवरही आपले मत मांडले. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादीने कधीही चर्चा केली नाही. प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीत यावं यासाठी काँग्रेसचे नेते त्यांच्या संपर्कात होतेमात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झालं आहे. मात्र काँग्रेससोबत अजून शेट्टी यांची चर्चा सुरु आहे, अशी माहिती पवारांनी दिली.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत येण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. त्यावर आघाडीने निर्णय घेण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. तसंच स्वाभिमानी तीन जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे आज काँग्रेस-राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी किती जागा सोडणार, या निर्णयावर सर्वांचे लक्ष लागले आहे.