प्रवीण गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांनी दिले ‘हे’ स्पष्टिकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आपण काँग्रेसकडे प्रवीण गायकवाड यांची शिफारस केली नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना तिकीट मिळणार असे गृहीत धरले जात असतानाच अचानक मोहन जोशी यांना तिकीट दिले गेले. तेव्हा प्रवीण गायकवाड हे शरद पवार यांचे उमेदवार असल्याने ऐनवेळी त्यांचे तिकीट कापले गेल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, पुणे शहरात काँग्रेसपेक्षा आमची राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. असे असेल तरी काँग्रेस जो उमेदवार देईल, त्याला पाठिंबा देण्याची सूचना केली होती. कोणता उमेदवार द्यावा, अशी शिफारस केली नव्हती. त्यामुळे प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी द्यावी, असे सांगण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

पार्थने लढावे ही माझी इच्छा

एकाच घरातील किती जणांनी निवडणुक लढवावी, अशी भूमिका घेऊन पार्थ निवडणुक लढविणार नाही, असे सुरुवातीला शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलून स्वत: म्हाडातून माघार घेऊन मावळमधून पार्थ निवडणुक लढवेल, अशी घोषणा केली होती. या उलटसुलट घोषणाविषयी शरद पवार यांनी सांगितले की, पार्थने निवडणूक लढवावी, अशी माझी इच्छा होती. पण एकाच घरातील किती लोकांनी निवडणुक लढवावी, असे वाटत असल्याने सुरुवातीला मी त्याला विरोध केला होता.

मावळ मतदारसंघात आम्ही लागोपाठ तीन वेळा पराभूत झालो आहोत. या मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ खाली कोकणात येतात. तेथे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. आमच्याकडे उमेदवार नव्हता. शिवाय शेकापच्या नेत्यांनी पार्थ पवार याला उमेदवारी दिली तर आपण विजयी होऊ शकतो. आम्ही पूर्ण ताकद त्याच्या मागे लावूू असे सांगितले. त्यातून नवीन उमेदवार देण्यासाठी पार्थला रिंगणात उतरविले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बारामती आणि मावळ या दोन्ही जागा आम्ही जिंकू असेही त्यांनी सांगितले.