अखेर महाआघाडीकडून उत्तर मिळालं ; शरद पवारांसह पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ‘यांची’ नावं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार असे वारंवार सांगण्यात येते. एव्हढेच नाही विरोधी पक्षांवर टीका करताना वारंवार तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ? असा सवाल केला जातो. विरोधी पक्षाकडे पंतप्रधान होण्याच्या कुवतीचे नावच नाही असा टोला देखील विरोधी पक्षाला लगावला जातो मात्र अखेर विरोधी पक्षाकडून या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जळगाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना भावी पंतप्रधान कोण होऊ शकतात, पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये कोण आहे यांची नावे संगितली यावेळी ते म्हणाले, “भाजपपेक्षा आघाडी सरकारकडे चांगली कामे करणारे उमेदवार पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बसपा अध्यक्षा मायावती, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नावे भुजबळ यांनी घेतली. त्यांनी भर सभेत घेतलेल्या या नावांमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

चौकीदाराच्या पगारात घर चालवून दाखवावं

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, मोदी वरंवार चौकीदार असल्याच्या घोषणा देतात पण ‘मैं चौकीदार हूँ’ ची घोषणा देणाऱ्या मोदी सरकारने स्वतः मर्सडिज कारमधून न फिरता, चौकीदाराच्या पगारात घर चालवून दाखवावे आणि मग म्हणावे की, ‘मैं चौकीदार हूँ’, असा खोचक टोला भुजबळ यांनी मोदी सरकारला दिला. जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत छगन भुजबळ बोलत होते.