शॉटगन शत्रुचा काँग्रेसविरोधी प्रचार ; म्हणाले अखिलेश यादवच पंतप्रधान पदासाठी योग्य

लखनौ : वृत्तसंस्था – चित्रपटात विविध भूमिका साकारणारे अभिनेते व काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा राजकारणातही सतत भूमिका बदलू लागले आहेत. भाजपमध्ये सतत पक्षविरोधी भूमिका घेणारे शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले खरे मात्र काँग्रेसमधेही त्यांनी तोच प्रकार सुरु केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी लखनौमध्ये आपल्याच काँग्रेस पक्षाविरोधात प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच अखिलेश यादवच पंतप्रधान पदासाठी योग्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते त्यांच्यावर नाराज झाले आहेत.

भाजपमधून पक्षांतर केलेले शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या तिकिटावर पटनासाहिबमधून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा समजावादी पक्षाकडून लखनौमधून निवडणूक लढवत आहेत. एकीकडे पक्ष आणि दुसरीकडे पत्नी अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या शत्रुघ्न यांनी काँग्रेसविरोधी भूमिका घेत पत्नीचा प्रचार करण्याला प्राधान्य दिले आहे.

अखिलेश यादव हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार
पूनम सिन्हा लखनौमधून उमेदवारी अर्ज भरताना शत्रुघ्न सिन्हा त्यांच्यासोबत होते. तसेच त्यांच्या प्रचारासाठी ते लखनौमध्ये रोड शोमध्येही सहभागी झाले होते. आता ते समाजवादी पक्षाच्या मंचावर पूनम यांच्या प्रचारासाठी आले होते. या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेसविरोधी प्रचार करत सपा-बसपा आघाडीसाठी मते मागितली. तसेच या सभेत त्यांनी अखिलेश यादव आणि मायावती यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. सपच्या उमेदवाराला मते द्या, असे सांगताना शत्रुघ्न सिन्हा यांनी अखिलेश यादव हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत, असेही जाहीर करून टाकले.

लखनौमध्ये काँग्रेसतर्फे आचार्य प्रमोद कृष्णम हेही रिंगणात आहेत. त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. पतीधर्मापेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य द्यावे असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.