सत्ता स्थापनेसाठी शिवसेना झाली ‘सेक्युलर’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – शिवसेना हा अत्यंत कडवा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. देशाचे नाव हिंदुस्थान असे करावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने आपली हिंदुत्ववादी भूमिका काहीशी बाजूला ठेवली असून देशाची घटना सेक्युलर असून त्यानुसारच देशाचा कारभार चालतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही असेच मत असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सांगितले.

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आता लवकरच प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने पावले पडू लागली आहे. मात्र, काँग्रेसकडून किमान समान कार्यक्रमात सेक्युलर हा शब्द असावा, असा आग्रह धरण्यात आला आहे. तेव्हा शिवसेनेने यापूर्वी केलेल्या स्थानिक पातळीवरील आघाडीत अशी कोणतीही अट ठेवली नव्हती असे सांगितले. मात्र, काँग्रेस सेक्युलर हा शब्द ठेवण्यावर ठाम राहिली आहे.

त्यातून गुरुवारी सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशाची घटना ही सेक्युलर आहे. त्यानुसारच सरकारचा कारभार चालतो. कामे करताना धर्म, जातीचा विचार न करता सरकारने कारभार करावा, असे मत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मत होते, हे आवर्जुन सांगितले. त्यावरुन सेक्युलर या शब्दाला आपला विरोध नसल्याचे शिवसेनेने सूचित केले आहे.

भारताचे नाव हिंदुस्थान करावे अशी शिवसेनेची मागणी आहे. या मागणीमुळेच शिवसेना आपले मुख्यपत्र सामना मधून भारत असा उल्लेख न करता हिंदुस्थान असा देशाचा उल्लेख करत असते.

Visit : Policenama.com