शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांवर ‘निशाणा’, तुम्ही ‘गुप्त’पणे काय केलं ते आधी सांगा, मग…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानानंतर शिवसेना-भाजप नेते यांच्यात आता वाकयुद्ध सुरु झाले आहे. शिवसेनेने 2014 च्या निकालानंतर काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव दिला होता असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. यानंतर शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी जोरदार पटलवार केला आहे. उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने जे काही केले ते खुलेआम केले. आपल्याच युतीतील सहकारी पक्षातील लोकांचे आणि आपल्याच पक्षातील नेत्यांचे छुप्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचे कारनामे उद्धव ठाकरेंनी कधी केले नाहीत.

मनिषा कांयदे म्हणाल्या की, 2014 मध्ये शिवसेनेने नाही तर भाजपनेच युती तोडली होती. 2014 च्या लोकसभेत मोदी लाटेनंतर विधानसभा निवडणूकीत शिवसेनेशी भाजपने युती तोडली. आपल्या नेतृत्वात एकनाथ खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा केली होती, भाजप-शिवसेना वेगवेगळे लढले आणि शक्तिमान भाजपला तेव्हाही बहुमत मिळाले नव्हतेच. केवळ 122 आमदारांच्या जोरावर आपण सत्ता स्थापन केली, तेव्हा कोणते अदृश्य हात आपल्या मागे होते ते आधी सांगा असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शिवसेना स्वतंत्र राजकीय पक्ष आहे, तेव्हा 2014 मध्ये राष्ट्रीय स्तरावर पूर्ण बहुमतात सत्तेत आल्यावर सतत शिवसेनेचे खच्चीकरण करु पाहत आहे हे लक्षात आल्यावर शिवसेनेने आपला स्वतंत्र बाणा जपून राजकीय सोयरीक करण्याचा प्रयत्न केला असला तर त्यात वावगे काय? असा सवाल आमदार मनिषा कायंदे यांनी केला. त्या म्हणाल्या की, शिवसेनेने जे केले ते खुलेआम केले. आपल्याच युतीतील सहकारी पक्षातील लोकांचे आणि आपल्याच पक्षातील नेत्यांचे छुप्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचे कारनामे त्यांनी कधी केले नाही असा आरोप शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला.

फेसबुक पेज लाईक करा –