शिवसेनेनेही काँग्रेसला साथ दिली होती, मग राज ठाकरेंच्या नावानं शिमगा का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष लोकसभेच्या मैदानात उतरला नाही मात्र राज ठाकरे यांनी  काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे  प्रचारसभा घेणार आहेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर शिवसेनेकडून टीका होत आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेनेही काँग्रेसला साथ दिली होती, मग राज ठाकरेंच्या नावानं शिमगा का? असे ट्विट करून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी शिवसेनेने एकही जागा न लढवता काँग्रेसला जाहीर पाठींबा दिला होता, त्यांचाच वारसा राज ठकारेंही चालवत आहेत. मग त्यांच्या नावाने शिमगा का करता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला केला आहे. राज ठाकरे यांची बाजू घेताना आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की , १९८० सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने एकदेखील जागा लढवली नव्हती.शिवाय त्याच निवडणुकीत सेनेने काँग्रेसला समर्थन देखील दिल होत. आज राज ठाकरे देखील एकही जागा लढवत नाहीये, त्यांच्या नावाने शिमगा करणाऱ्या लेकरांच्यासाठी ही खास माहिती…! तसेच ही माहिती देतानाच मार्मिकमध्ये आलेल्या लेखाचे छायाचित्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये वापरलं आहे.

राज ठाकरे यांनी आपला पक्ष आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. मात्र  ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीसमोर भाजपा-शिवसेनेचे कडवे आव्हान असेल, त्या मतदारसंघात राज ठाकरे हे सभा घेणार आहेत.

राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी राज ठाकरे सहा ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविला होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.