राजस्थानात मोठा राजकीय भूकंप होणार ? संजय राऊतांनी सांगितलं काँग्रेसचं भवितव्य

मुंबई : पोलीनामा ऑनलाइन – कर्नाटक, मध्य प्रदेशात सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता भाजपने राजस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट पक्षावर नाराज आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे सचिन पायल काँग्रेसपासून दूर जाण्याच्या भूमिकेत आहेत.

त्यामुळे काँग्रेसला आणखी एक हादरा बसण्याची शक्यता आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यांच्या चर्चांना उधाण आले आहे.
राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होणार नाही. कोरोनाच्या संकटात अशा कोणत्याही प्रकारचं राजकारण करण्याची गरज नाही. राजस्थानमध्ये राजकीय भूकंप घडवण्याचा मोठा प्रयत्न होत आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचा राजकीय भूकंप होणार नाही. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे राजकारणातील कसलेले पैलवान आहे, असं देखील संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसच्या 30 आमदारांचे समर्थन मिळेल, जर त्यांना या आमदारांची साथ मिळाली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारचं नुकसान होऊ शकतं. पण तिसरा गट बनवण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या एक तितृयांश आमदारांच पाठबळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट यांना 35-40 आमदारांचे समर्थन लागेल जे आव्हानात्मक आहे.