‘सार्वजनिक ठिकाणी मुडदे पडू नयेत म्हणून राज्यकर्त्यांनी आधी ‘कोरोना’च्या तिरडीवरून उठावं’ : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने तीन वेळा लॉकडाउन वाढवल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडू लागला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. लॉकडाउनमध्येही जनजीवन पूर्वपदावर आणण्याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, 17 मे नंतर पुढे काय? हा प्रश्न अनुत्तरित असून, शिवसेनेनेयावरून सरकारला जाब विचारला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून देशातील आणि महाराष्ट्रातील परिस्थितीचा उहापोह करत येणार्‍या संकटांची जाणीव सरकारला करून दिली आहे. त्याचबरोबर राज्यकर्त्यांनी कोरोनाचे भजन थांबवून तिरडीवरून उठायला हवे असे सूचित केले आहे.

देशभरात कोरोनाचा फास गळ्याभोवतीही आवळलेलाच आहे. विनाअनुदानीत शाळांतील हजारो शिक्षकांना दोन महिन्यांपासून त्यांचे तुटपुंजे वेतनही मिळू शकलेले नाही. घरेलू कामगारांची अवस्था त्याहून बिकट आहे. या वर्गास कोणीच वाली नाही. घरकाम करणार्‍या ‘बाया’ झोपड्या किंवा चाळीत राहतात. त्यांना आता इतर निवासी संकुलात प्रवेश बंदी आहे व त्यांनी कितीकाळ मोफत धान्याच्या रांगेत उभे राहायचे? याचे उत्तर सरकारकडे नाही. मोदींचे व महाराष्ट्राचे सरकार खंबीर आहे वगैरे ठीक, पण जनतेचा धीर सुटणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. अन्यथा लोकांच्या संतापाला तोंड देणे कठीण होईल. लोकांचे पगार, पेन्शन वगैरे थकले आहेत.

भारतीय स्टेट बँकेने मुदत ठेवींवर देण्यात येणार्‍या व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे व्याजावर गुजराण करणार्‍या लोकांचेही हालच होतील. हे सर्व कोरोनामुळेच घडत आहे हे खरे, पण म्हणून कोणत्याही सरकारला हातावर हात ठेवून बसता येणार नाही. लोकांना आजच जगायचे आहे. त्यांना उद्याचा हवाला नको. ‘आता कशाला उद्याची बात, बग उडूनि चालली रात’, अशी अवस्था सगळ्यांचीच झाली आहे. लोकांना जगायचे आहे, अगदी इस्पितळाच्या वॉर्डात बाजूला मृतदेह ठेवून उपचार होत असतील तरी त्यांना जगायचे आहे. आज लोकं इस्पितळात मरत आहेत. त्यांना मृतदेहांची भीती वाटत नाही, पण लॉक डाऊननंतर होणारी उपासमारी, आर्थिक दुरावस्था यामुळे घरांत, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी मुडदे पडू नयेत म्हणून राज्यकर्त्यांनीही ‘कोरोना’चे भजन थांबवायला हवे. सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे. लोक आपोआप कामधंद्याला लागतील! ‘लॉक डाऊन’नंतर सरकारकडे काय योजना आहे? याचे उत्तर कोरोनाच्या तिरडीवरून उठण्याआधीच जनतेला मिळावे!, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.