पारनेरमधील राष्ट्रवादीच्या ‘नागमोडी’ राजकारणाला कल्याणमध्ये शह, शिवसेनेची थेट भाजपशी युती

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडून शिवसेनेला शह देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं कल्याणमध्ये मात दिली आहे. कल्याण पंचायत समितीमध्ये शिवसेनेनं थेट भाजपशी हातमिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला आहे.
कल्याण पंचायत समिती सभापती व उपसभापतीसाठी नुकतीच निवडणूक झाली. या ठिकाणी भाजपचे पाच आणि शिवसेनेचे चार तर राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी यांची राज्यात युती असून सत्तेत असल्याने कल्याण पंचायत समितीत याच दोन्ही पक्षांचे सभापती आणि उपसभापती निवडून येतील असा अंदाज होता. सभापती व उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचे अधिच निश्चित झाले होते, मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रविवारी चक्र फिरली.

भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क करून खलबतं केली. त्यांच्यातील चर्चेअंती भाजपने शिवसेनेला विनाअट पाठिंबा जाहीर केला. भाजपच्या पाच सदस्यांच्या पाठिंब्याच्या बळावर शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांनी सभापतीपदी बाजी मारली. त्यांना 7 मतं मिळाली. तर त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना केवळ पाच मतं मिळाली. उपसभापती पदावर रमेश बांगर निवडून आले आहेत. त्यांना सात तर ऐनवेळी राष्ट्रवादीसोबत जाऊन उमेदवारी दाखल केलेले भरत भोईर यांना पाच मतं मिळाली.

पारनेरमध्ये राष्ट्रवादीने खेळलेल्या राजकारणाला शिवसेनेनं दिलेलं हे प्रत्युत्तर असल्याचे मानलं जात आहे. राष्ट्रवादीने पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक फोडले. या नगरसेवकांनी थेट बारामती येथे जाऊन अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष विस्ताराची स्पर्धा सुरु असल्याची चर्चा सुरु झाली. आता शिवसेना देखील या स्पर्धेत उतरली आहे. हे मतभेत स्थानिक पातळीवरच राहतात की राज्य पातळीवर याचे पडसाद उमटतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.