ही तर मोदींची बदनामी, BJP च्या लस वाटप घोषणेवर शिवसेनेचा ‘निशाणा’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – देशात पूर्वी जातीधर्माच्या नावावर फूट पाडण्याचे प्रयत्न व्हायचे. आता लसीच्या नावावर देशात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी (shivsena Mp Sanjay Raut Attacks Bjp Over Bihar Election Manifesto) भाजपवर केला आहे. तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूँगा असं आम्ही लहानपणापासून ऐकत आलो होतो. पण आता तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला लस देऊ असं ऐकायला मिळतंय. ही दुर्दैवी विसंगती असून जिथं निवडणूक आहे तिथंच लस देणार का, असा प्रश्नही खासदार राऊत यांनी भाजपला केला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या जाहीरनाम्यातील मोफत कोरोना लसू देऊ या आश्वासनांविषयी ते बोलत होते.विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं बिहारमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजप व संयुक्त जनता दलाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर, लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानं भाजप-जेडीयू आघाडीला धक्का देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपनं आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. बिहारची सत्ता दिल्यास राज्यातील जनतेला मोफत करोना लस दिली जाईल, असं आश्वासन देण्यात आले आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी भाजपला घेरलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीनंतर शिवसेनेनंही भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

खासदार राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे. नोकऱ्या देण्याचं आश्वासन देणं. रोटी, कपडा आणि मकान यासाठी शब्द देणं हे समजू शकतं. मात्र, आमचा आक्षेप लसीच्या मुद्द्यावर आहे. ज्या पद्धतीनं भाजपनं हा मुद्दा निवडणूक प्रचारात आणला आहे, त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी होत आहे. पंतप्रधान मोदी यांची जी प्रतिमा देशातील जनतेत आहे, त्या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचे राऊत यांनी म्हटल आहे.