संजय राऊतांचं खुलं आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचं नाव…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकरणावरून चांगलीच जुंपल्याचे पहायला मिळत आहे. आता या प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली घेतली आहे. संजय राऊत यांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी हिंमत असेल तर आदित्य ठाकरे यांचे नाव घ्यावं, असं खुलं आव्हानच विरोधकांना दिले आहे.

आदित्य ठाकरेंचा या सर्व प्रकरणाशी काय संबंध ? हिंमत असेल तर भाजपाच्या लोकांनी जाहीरपणे त्यांचं नाव घ्यावं. ते चांगलं काम करत आहेत, मदत करत आहेत, बदनामी करण्याची मोहीम सुरु असून हे चांगलं राजकारण नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यानी आपली प्रतिक्रिया दिली.

राऊत पुढे म्हणाले, एका उभरत्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर काय फायदा होणार आहे. हे राज्याचंच नुकसान आहे. कोणत्याही पक्षातील युवा नेत्यांचं खच्चीकरण केलं जाऊ नये, असे राऊत यांनी म्हटले. आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला जात असल्यासंबंधी विचारण्यात आले असता राऊत यांनी, बदनामी करण्याची मोहिम सुरु असून हिंमत असेल तर नाव घ्या असं आव्हान देत हे चांगल्या संस्कृतीचं राजकारण नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

कायदा आम्हालाही माहित आहे

चौकशी संदर्भात बोलताना राऊत म्हणाले, ईडी चौकशी करत आहे तर करु द्या. आम्हालाही कायदा माहित आहे. ज्यावेळी कायदा तयार होतो त्यावेळी आम्ही देखील संसदेत असतो. कायदा कसा मोडला जातो हे देखील आम्ही पाहिलं असल्याचे सांगत ज्यांना जो तपास करायचा आहे तो करु देत असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, सत्य समोर आलं पाहिजे हे मलाही वाटतं. सुशांत हा मुंबईचा मुलगा आहे. कोणी कितीही दावा केला तरी तो मुंबईचा आहे आणि त्याला न्याय देण्याची जबाबदारी आणि कर्तव्य आमचे आहे. मुंबई पोलीस आणि सरकारचं ते दायित्व आहे.