महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी शपथविधी उरकून जे झालं तेच नेमकं सचिन पायलट यांच्यासोबत : शिवसेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सामना अग्रलेखातून राजस्थानमधील राजकीय नाट्यावर भाष्य करण्यात आले आहे. ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. “सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा” या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करायचे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा शिकवला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

काँग्रेसने राजस्थानमधील सरकार वाचविण्यात यश मिळवले आहे. बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन प्रियंका-राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पायलट यांनी माघार घेतली. काँग्रेस हितासाठी आपण यापुढेही काम करत राहू, असे पायलट यांनी स्पष्ट केले. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे व मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे सरकार चालविण्यासाठी स्पष्ट बहुमत आहे. या महिनाभराच्या घोडेबाजारात हसे झाले आहे ते भारतीय जनता पक्षाचे. आपल्या विचारांची नसलेली राज्या-राज्यांतील सरकारे आम्ही चालू देणार नाही किंवा सरळ पाडू हे त्यांचे धोरण आहे, पण राजकीय घमेंडीत त्यांचा सौदा चुकतो व शेअर बाजार गडगडतो, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. महाराष्ट्रात पहाटेचा शपथविधी उरकूनही जी फसगत झाली तोच प्रकार सचिन पायलट यांच्याबाबत झाला, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.