विजय मल्ल्या प्रकरणातील कागदपत्रे ‘गायब’, सुप्रीम कोर्टानं टाळली सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   सर्वोच्च न्यायालयात आज बँकांची कर्जे बुडवून लंडनमध्ये प्रसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या प्रकरणी सुनावणी होणार होती. पण त्याच्या खटला संदर्भातील कागदपत्रे गायब झाल्याने न्यायालयाने सुनावणी टाळली आहे.

२०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यावरती मल्ल्याने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आज त्यावर सुनावणी होणार होती. मात्र, केससंदर्भातील कागदपत्रे गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने ही सुनावणी २० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. तीन वर्षांपूर्वी मल्ल्याने ही याचिका दाखल केली आहे.

न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जात मल्ल्याने त्याची संपत्ती कुटूंबीयांच्या नावे केली होती. या प्रकरणी मल्ल्याने याचिका दाखल केली होती. गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपल्याच रजिस्ट्री अधिकाऱ्यांची ही याचिका अद्याप न्यायालयासमोर का आली नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची नावे सुद्धा विचारली होती. दरम्यान, आता या याचिकेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

९ हजार कोटींचा लावला चुना

किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय मल्ल्यावर देशातील १७ बँकांचे ९००० कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. कर्ज न फेडताच तो भारतातून पळून गेला होता. ३ मार्च २०१६ मध्ये मल्ल्यानं भारत सोडून ब्रिटनमध्ये पलायन केलं होतं. १४ मे २०२० रोजी इंग्लंडनं मल्ल्याचा भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला होता.