नोएडामधील ‘ते’ 6 कोरोना संशयित ‘निगेटिव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाशी संपर्कात आलेल्या सहा संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे गौतमबुद्धनगर जिल्हाधिकार्‍यांनी आज सकाळी जाहीर केले.
नोएडामधील एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे लक्षात आल्यावर त्याला विलगकीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या रुग्णाच्या संपर्कात ६ जण आल्याचा संशय होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या ६ जणांना वेगळे ठेवण्यात आले होते. त्यांचे नमूने घेण्यात आले होते. त्याचा चाचणी अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. त्यात हे अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

असे असले तरी खबरदारी म्हणून त्यांना आणखी १४ दिवस वेगळे ठेवण्यात येणार आहे. या काळात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यांच्यात काही लक्षणे आढळल्यास पुन्हा परिक्षण करण्यात येणार आहे. प्रशासन सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमेरिकेने परदेशातून येणार्‍या नागरिकांवर अनेक निर्बंध लादले असून ज्या देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले. तेथून येणार्‍या नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. भारतातीलही नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.

भारतानेही चार देशातील नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहे. तसेच जपान आणि दक्षिण कोरियाच्या नागरिकांना दिली जाणारी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ ही सुविधाही रद्द करण्यात आली आहे.