मद्यपी पित्याचा मुलाकडून खून

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातून सणानिमित्त गावाला गेलेल्या मुलाने दारुच्या नशेत कोयता घेऊन गेलेल्या वडिलांच्या तावडीतून आईला वाचविण्यासाठी वडिलांचा खुन केल्याचा प्रकार घडला.
अंगद किसन डोके (वय ५०, रा. मातोळा, ता. औसा, जि. लातूर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. त्यांचा धाकटा मुलगा ज्ञानेश्वर डोके याला भादा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, अंगद डोके यांचा मोठा मुलगा ज्योतीराम डोके हा पुण्यात मोबाईलचे दुकान चालवितो. तर, लहान मुलगा ज्ञानेश्वर हा चालक म्हणून काम करतो. गौरी गणपतीनिमित्त दोघेही पुण्याहून आपल्या कुटुंबासह मातोळा गावी आले होते.

अंगद डोके हे दारूच्या नशेत घरातील प्रत्येकांना शिवीगाळ करून मुलांना घरातून बाहेर जावा, असे म्हणत होते. रात्रीच्यावेळी हे भांडण वाढले. मद्यपी वडिलांनी मुलांसह पत्नीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यातून घरातील ऊस तोडण्याचा कोयता घेऊन ते पत्नीच्या अंगावर धावून गेले. आपल्या आईला सोडविण्यासाठी धाकट्या ज्ञानेश्वरने वडिलांच्या हातातून कोयता बळजबरीने काढून घेऊन आईची सुटका केली. तेव्हा वडिलांनी शिवीगाळ सुरुच ठेवली. त्यामुळे रागाच्या भरात ज्ञानेश्वर याने वडिलांच्या हातातून काढून घेतलेल्या कोयत्याने वडिलांच्याच मानेवर वार केला. त्यात वडिलांचा जागीच मृत्यु झाला.
याप्रकरणी मोठा मुलगा ज्योतीराम डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ज्ञानेश्वर डोके याला अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –