सोनिया गांधींनी घेतली डी.के. शिवकुमारांची ‘तिहार’मध्ये भेट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी सकाळी तिहार कारागृहात जाऊन कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या बरोबर कर्नाटकचे प्रभारी काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाळ हेही उपस्थित होते.
शिवकुमार यांना अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या महिन्यात मनी लॉड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यांना सध्या तिहार मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. सोनिया गांधी सकाळी ९ वाजता तिहार कारागृहात पोहचल्या. त्यांनी शिवकुमार यांच्याबरोबर सुमारे अर्धा तास चर्चा केली.

यापूर्वी माजी अर्थमंत्री पी चिंदमबरम यांना सीबीआयने अटक केल्यानंतरही सोनिया गांधी यांनी त्यांची तिहार कारागृहात जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेही होते.

कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आणण्यात शिवकुमार यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. त्यानंतर भाजपाने काँग्रेस आमदारांना फोडून भाजपाची सत्ता आणली. त्यानंतर शिवकुमार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडिग प्रकरणात अटक केली होती.

Visit : Policenama.com