सोनिया गांधींनी राज्यातील नेत्यांना दिल्या ‘या’ सुचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील सत्तास्थापनेबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सर्व मुद्यावर एकमत झाले असून लवकरच सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांना समसमान वाटपासाठी आग्रही राहण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीत आज बऱ्याच घडामोडी घडल्या. आज झालेल्या बैठकीनंतर महाविकासआघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त आले. यात शिवसेना राष्ट्रवादीला प्रत्येकी 15 – 15 मंत्रिपद तर काँग्रेसला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या मुंबईत आघाडीच्या नेत्यांची बैठकी होणार आहे. त्याआधीच 48 तासात सत्तास्थापनेचा दावा आघाडीच्या नेत्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत महाविकासआघाडी सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. उद्धव ठाकरेंशी चर्चेनंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आघाडीतील शिवसेनेची विचारधारा ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारधारेशी भिन्न आहे. मात्र, तरीही राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, भविष्यात या आघाडीत बिघाडी होऊ नये आणि राज्यातील सरकार सुरळीत चालावे यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून कळते. या समन्वय समितीमध्ये 12 सदस्य असण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि तिन्ही पक्षांच्या प्रमुखांसह इतर नेत्यांचा समावेश असेल असे सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com