सोनू सूदनं प्रवासी मजुरांच्या मदतीसाठी प्रसिद्ध केला हेल्पलाईन नंबर ! म्हणाला- ‘चला घरी सोडून येतो’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सोनू सूद सध्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. त्याच्यामुळं अनेकजण सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. सोनू या मजुरांची मदत एखाद्या देवदूताप्रमाणे करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना एका ट्विटवर किंवा मेसेजवर त्यांच्या घरी सोडत आहे. सोनू सूदनं आता मजुरांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केला आहे. या नंबरच्या मदतीनं आता मजुर त्याला कॉन्टॅक्ट करू शकणार आहेत.

सोनूनं या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. सोनूनं ट्विटमध्ये एक इमेज शेअर केली आहे. यावर लिहलंय की, “माझ्या प्रिय मजुर बंधू आणि भगिणींनो. जर तुम्ही मुंबईत आहात आणि तुम्हाला घरी जायचं आहे. तर कृपया या नंबरवर कॉल करा- 18001213711. तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता व्हॉट्सअ‍ॅपदेखील करू शकता. नंबर आहे- 9321472118. सोबतच ही माहिती नक्की द्या की, तुम्ही किती लोक आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे. मला आणि माझ्या टीमला जी मदत करणं शक्य आहे आम्ही नक्की करू. आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.”

सोनूनं ट्विटमध्ये हा मजकूर शेअर करताना खास कॅप्शनही दिलं आहे. जे चाहतांना खूप आवडलं आहे आणि त्याचा हेतू आहे. कॅप्शनमध्ये सोनू म्हणतो, “चला घरी सोडून येतो.”