गलवान खोर्‍यामधील सैनिक पाठीमागे हटल्यानंतर चीननं दिली प्रतिक्रिया, ड्रॅगन म्हणाला – ‘भारतासोबत लष्करी चर्चेमध्ये ठरलेल्या गोष्टीची अंमलबजावणी’

बीजिंग : वृत्तसंस्था –  गलवान येथे झालेल्या संघर्षानंतर भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण बनले होते. त्यातच आता चीनने आपले सैन्य दीड किमी मागे घेतले आहे. यावर चीनने सांगितले की, वास्तविक नियंत्रण रेषेवरली ताणतणाव दूर करण्यासाठी दोन्ही कडून प्रगती झाल्याचे चिनने सांगितले. पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी दोन देशांमध्ये कमांडर स्तरावरील चर्चेनंतर सहा दिवसांनी चीनने हे विधान केले आहे. मात्र, चिनी परराष्ट्र मंत्रालयाने सहा दिवसांत काय प्रगती केली आहे, याबाबत तपशीलवार माहिती दिली नाही.

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले, चीन आणि भारत सैन्याने 30 जून रोजी कमांडर स्तरीय संवाद साधला. दोन्ही बाजूंच्या चर्चेच्या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या सहमतीची आम्ही अंमलबजावणी करत आहोत. त्यांना भारतीय प्रसारमाध्यातील बातम्यांविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की चीन सैन्याने माघार घेतली आहे.

वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनी सैन्य गलवान खोऱ्यामधील हिंसाचाराच्या ठिकाणापासून सुमारे दीड किमी आंतरावरून मागे हटली आहे. दोन्ही देशांच्या सैन्नं स्थानांतरणाबाबत सहमती दर्शवली आहे आणि सैन्याने सद्यस्थितीपासून माघार घेतली आहे. गलवान खोऱ्याजवळ आता एक बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडू नयेत.