मार्क झुकरबर्ग, जेफ बेजोस, सुंदर पिचाई आणि टिम कुक यांची 5 तास चौकशी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   अमेरिकन खासदारांनी बुधवारी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची (सीईओ) चौकशी केली. खासदारांनी या कंपन्यांद्वारे कथित दृष्ट्या दबदबा किंवा एकाधिकाराची स्थिती निर्माण करणे आणि प्रतिस्पर्ध्याचे नुकसान करण्याबाबत त्यांना प्रश्न विचारले. मात्र, जगातील या मोठ्या कंपन्यांना योग्य रस्त्यावर आणण्यात खासदारांचे प्रयत्न किती यशस्वी होतात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संसदेच्या एकाधिकार व्यापार विरोधी न्यायालयीन उपसमितीच्या सुनावणी दरम्यान खासदारांनी फेसबुकचे मार्क झुकरबर्ग, अमेझॉनचे जेफ बेजोस, गुगलचे सुंदर पिचाई आणि अ‍ॅप्पलचे टिम कुक यांना प्रश्न विचारले. मागच्या वर्षी समितीने सिलिकॉन वॅलीतील दिग्गज कंपनीच्या व्यवसायाची पडताळणी केली होती. या कंपन्याचे आणखी नियंत्रण करण्याची गरज आहे का, हे पाहण्यासाठी ही पडताणी करण्यात आली होती.

सुमारे पाच तास चाललेल्या या सुनावणीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून कोणतीही विशेष बाब समोर आली नाही. मात्र, अधिकार्‍यांना कठोर प्रश्नांचा सामना करावा लागला. अनेकदा दोन्ही पक्षांच्या खासदारांनी त्यांना रोखले सुद्धा. मुख्य कार्यकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खासदारांसमोर उपस्थित होते. अनेकदा सर्व मुख्य कार्यकरी एकाच वेळी स्क्रीनवर दिसून आले. मुख्य कार्यकारींनी समितीसमोर अनेक प्रकारचे आकडे देऊन सांगितले की, त्यांना किती मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. आणि त्यांचा उत्साह आणि आवश्यक सेवा ग्राहकांसाठी किती जरूरी आहेत. सुनावणीच्या खोलीत समितीचे सदस्य मास्क घालून बसले होते.