साताऱ्यातील ‘सैनिकी’ स्कुलमधील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यु

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – येथील सैनिक स्कुलमध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा स्कुलमधील पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यु झाला. कुणाल कृष्णा वाणी (वय१७, रा. नाशिक) असे या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल हा सैनिक स्कुलमध्ये असलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सहावीपासून तो येथे शिकत होता. सध्या तो बारावीमध्ये होता.

बारावीची परीक्षा सुरु असल्यामुळे शनिवारी त्याचे वडिल कृष्णा वाणी हे त्याला भेटायला आले होते. कुणालचा भाऊ पुण्यात महाविद्यालयात शिकत आहे. त्याने रविवारी दुपारी दीड वाजता फोन करुन गप्पा मारल्या होत्या. रविवारची सुट्टी असल्याने काही मुले पोहण्यासाठी तलावामध्ये उतरली होती. त्यामध्ये कुणालही होता. पोहत असताना कुणाल अचानक बुडाला हा प्रकार त्याच्यासोबत असलेल्या मुलांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काल कुणालला तलावातून बाहेर काढले. त्याच्या नाका तोंडामध्ये पाणी गेल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. सैनिक स्कुलच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती कुणालच्या वडिलांना दिली. ते तातडीने सातारा येथे पोहचले. मात्र, या घटनेबाबत सैनिक स्कुलच्या प्रशासनाकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही.