वेल्डर व्यवसायिकाच्या आत्महत्येबाबत महिला पोलिसासह चौघांविरुद्ध FIR दाखल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शेजारच्यांशी झालेल्या वादातून मारहाण झाल्यानंतर मुकुंदवाडीतील वेल्डर असलेल्या 51 वर्षीय व्यक्तीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी महिला पोलिसासह चौघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी खांडेभराड असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

Advt.

परमेश्वर धोंडगे व त्यांच्या घरातील तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक जण महिला पोलीस असून एक कंडक्टर आहे. त्यांनी वडिलांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत आत्महत्येस प्रवृत्त केले, असे तक्रारीत म्हटले आहे. मुकुंदवाडीतील स्वराजनगरात राहणारे वेल्डर शिवाजी अण्णा खांडेभराड (51) यांचे शेजारी राहणार्‍या सुरेखा धोंडगे यांच्याशी घरासमोर माती टाकण्यावरुन भांडण झाले होते.

त्यावेळी सुरेखा धोंडगे हिच्यासह तिच्या दोन मुलींपैकी पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या छाया आणि कंडक्टर मुलगी तसेच मुलगा परमेश्वर धोंडगे यांच्याशी भांडण झाले. त्यानंतर चौघांनी खांडेभराड घराबाहेर उभे असताना त्यांना मारहाण केली. तसेच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यावरुन खांडेभराड यांनी 22 ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास पोलिस ठाण्यात जातो असे सांगत थेट मालगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळून असून त्यामध्ये परमेश्वर धोंडगे, सुरेखा धोंडगे, छाया व कंडक्टर महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.