सुप्रिया सुळेंना ‘आव्हान’ देणार्‍या कांचन कुल यांना भाजपानं दिली ‘ही’ नवीन जबाबदारी

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांची पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांनी या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान दिले होते. पण, त्यांचा पराभव झाला होता.

तसेच भाजपमध्ये गेलेले विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे प्रवक्ते केलं आहे. तर, मागील वर्षी भाजपमध्ये प्रवेश करणारे धनंजय महाडिक यांच्यावरही पश्चिम महाराष्ट्र प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली आहे.

तर दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीचे शेवटच्या क्षणी तिकीट मिळवणारे राहुल नार्वेकर यांनाही प्रवक्तेपद दिलं आहे. भारती पवारही मागील वर्षी लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजपमध्ये आल्या होत्या. त्या नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार असून त्यांच्याकडेही भाजपने जबाबदारी सोपवली आहे.

सुप्रिया सुळे विरुध्द कांचन कुल

लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे जवळपास दीड लाख मतांची आघाडी घेत निवडून आल्या होत्या. तर, यात भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव झाला होता. सुप्रिया सुळेंच्या या विजयाने बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं. या मतदारसंघातून भाजपच्या कांचन कुल यांनी त्यांना आव्हान दिले होतं. आता कांचन कुल यांच्यावर भाजपनं नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.