सूर्यकुमार यादवला लवकरच भारतीय संघात स्थान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचा पराभव करत मुंबईनं पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. या विजयात मुंबईकर सूर्यकुमार यादव यानं मोलाची भूमिका बजावली आहे. सूर्यकुमार यादवनं १६ सामन्यात ४८० धावा ठोकल्या आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव हा भारताचा एबी डिव्हिलियर्स आहे, असं मत अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह याने व्यक्त केलं आहे.

स्पोर्ट्स वाहिनीवर बोलताना हरभजननं सूर्यकुमारची तुलना एबी डिव्हिलिअर्सची केली. तो म्हणाला, ‘मुंबईला जेतेपदापर्यंत पोहचवण्यात सूर्यकुमारनं आपली भूमिक चोख बजावली यात शंका नाही. सूर्यकुमारला फलंदाजी करताना एकाही गोलंदाजाना रोखणं कठीण झालं होतं. पहिल्या चेंडूपासून सूर्यकुमार गोलंदाजावर तुटून पडायचा. सूर्यकुमारकडे सर्व प्रकारचे फटके आहेत. कधी कव्हर्सच्या वरुन तर कधी स्वीपचा फटका मारण्यात त्याचा हातखंडा पाहून तो भारताचा ए.बी डिव्हिलीअर्स असल्याची खात्री पटतेय. सूर्यकुमारनं आपली कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. लवकरच त्याचा भारतीय संघात समावेश होईल.

गेल्या दोन वर्षांपासून सूर्यकुमारनं आयपीएल आणि स्थानिक सामन्यात सातत्यानं ठोस कामगिरी केली आहे. तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचार होऊ शकला नाही. मुंबईला पाचव्यांदा आयपीएल जेतेपद मिळवून देण्यात सूर्यकुमारची भूमिका मोलाची ठरली. त्याने १६ सामन्यात ४० हून अधिक सरासरीने ४८० धावा काढल्या.