शिक्षक की भक्षक ? पाण्यात चक्क विष मिसळून विद्यार्थीनीची केली हत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन  – शाळेतील पाणी पाण्यातून विषबाधा होऊन दहावीतील विद्यार्थीनीचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या शिक्षकानेच विषारी किटकनाशक तिच्या पाणी पिण्याच्या बाटली मिसळले असल्याचे समोर आले असून पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. निलेश बाळु प्रधाने असे या शिक्षकाचे नाव आहे. याची माहिती मिळाल्यावर गावकर्‍यांनी निलेश याची गावातून धिंड काढली आहे.

सानिका माळी हिच्या पाणी पिण्याच्या बाटलीत निलेश या शिक्षकानेच विषारी किटकनाशक मिसळल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांना हा एका किटकनाशकाच्या दुकानातून किटकनाशक घेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिरोळ तालुक्यातील शिरटी या गावातील सानिका नामदेव माळी (वय १६) ही दहावीतील मुलीचा कोल्हापूर येथे उपचार सुरु असताना सोमवारी मृत्यु झाला होता. शाळेतील पाणी पिल्यानेच त्यातून तिला विषबाधा झाल्याचा आरोप करुन तिच्या आईवडिलांनी चौकशीची मागणी केली होती. पोलिसांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल चार तासानंतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला होता.

सानिका ही शिरटी हायस्कुलमध्ये दहावीत शिकत होती. २० फेब्रुवारीला बाटलीतील पाणी पिल्यानंतर सानिका हिला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर सुरुवातीला शिरोळला व त्यानंतर तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. सानिकाला किटकनाशकामुळे विषबाधा झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी गावातील सर्व किटकनाशकाच्या दुकानाची झाडाझडती घेतली. त्यात एका दुकानातून निलेश किटकनाशक विकत घेत असल्याचे आढळून आले. त्यावरुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सानिका ही हुशार विद्यार्थीनी होती. मात्र, आपला अभ्यास झाला नाही.परीक्षेच्यावेळी आजारी पडेल असे औषध द्या असे तिने आपल्याला सांगितले होते. म्हणून तिच्या पाणी पिण्याच्या बाटली आपण किटकनाशक मिसळले होते, असा दावा या शिक्षकाने केला आहे.