देशात पहिल्यांदाच 10 अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात पहिल्यांदाच 700 मेगावॉट क्षमतेचे तब्बल दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार आहेत अशी माहिती देशाचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात ‘अंतराळ व अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते.

डॉ. आर. चिदंबरम म्हणाले की,  भारत आर्थिक क्षेत्रात विकसनशील आहे; परंतु अंतराळ विज्ञान व अणुऊर्जा क्षेत्रात विकसित देशांच्या यादीत आहे. याचे श्रेय डॉ. सारभाई व डॉ. भाभांना जाते.  देशात पहिल्यांदाच 700 मेगावॉट क्षमतेचे तब्बल दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार आहेत. 2031 पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता 22 हजार 480 मेगावॉटपर्यंत जाईल. 1960 आणि 70 च्या दशकात डॉ. विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे.

अणुऊर्जेमुळे औष्णिक प्रकल्पांतील प्रदूषण कमी होणार –

देशाची ऊर्जा मागणी वाढती आहे. अशावेळी औष्णिक निर्मितीतूनच सर्वाधिक वीज मिळत असली तरी त्यातून प्रदूषणही खूप होते.अणुऊर्जेच्या वापराद्वारे औष्णिक वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील प्रदूषणही कमी करता येणार आहे. अशीही माहिती डॉ.  चिदंबरम यांनी या परिषदेत दिली.

उपग्रह वाहनाचा पुनर्वापर करण्याचा विचार-

इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार म्हणाले की , भारताने क्रायोजनिक इंजीन तयार केले असून जीएसएलव्हीच्या तीन मोहिमांमध्येही यश मिळविले आहे. येत्या काळामध्ये उपग्रह वाहनाचा पुनर्वापर करण्याचा विचार सुरू आहे.