टेंडर घोटाळा : दोघे निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळा केल्याप्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी ही कारवाई केली. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सहायक लेखाधिकारी दत्तात्रय भाऊ साळवे व पाथर्डी पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक आनंद दत्तात्रय दिकोंडा यांचा निलंबित झालेल्यांमध्ये समावेश आहे.

नेवासा तालुक्यातील पाचेगाव पाणी योजनेत टेंडर घोटाळा झाला होता. सदर कामाची जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम (दक्षिण व उत्तर) विभागातील ७०० टेंडरची चौकशी जिल्हा परिषदेने केली. चौकशी समितीने तब्बल ७०० फाईल तपासल्या होत्या.

या प्रकरणात दिकोंडा यांनी निविदा दरामध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हा परिषद सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. नळ पाणी पुरवठा योजनेची नस्ती व रकमेत फेरसादर असल्याची बाब दत्तात्रय साळवे यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेली नव्हती. असे असताना ती निविदा नस्ती मंजुरीसाठी सादर केली. या दोघांच्या वर्तणुकीमुळे जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाचा भंग झाल्याने त्यांना निलंबित केल्याचे माने यांनी आदेशात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?
पाचेगाव (ता़ नेवासा) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाचेगाव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. १ कोटी ४५ लाख रुपयांच्या या कामासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. यात एका ठेकेदाराने सर्वात कमी म्हणजे १ कोटी २० लाख रुपये (उणे तीन टक्के) रकमेचे टेंडर भरले होते.

ते ऑनलाईनन मंजूरही करण्यात आले. मात्र, कार्यारंभ आदेश देताना ज्या ठेकेदाराने ६ टक्के जास्त रकमेची निविदा भरली होती, त्या ठेकेदाराच्या नावाने कार्यारंभ आदेश काढण्यात आला होता. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला निविदा रकमेपेक्षा सुमारे ९ लाख रुपये जास्तीचे मिळणार होते. याबाबत तक्रार आल्यानंतर या टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्यात आली. त्यात टेंडर घोटाळा उघडकीस आला.