ठाणे : जीवाची पर्वा न करता पोलीस कर्मचाऱ्यानं घेतली पाण्यात उडी, बुडणाऱ्या महिलेला वाचवलं !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे पोलिसांनी ठाण्यातील आत्महत्या करणाऱ्या एका महिलेचा जीव वाचवला आहे. ठाण्यातील हा प्रकार एकदम फिल्मी स्टाईलनं घडला आहे. ठाणे पोलिसांचे पोलीस नाईक गजेंद्र सोनटक्के यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता थेट उपवन तलावात उडी घेतली आणि महिलेचा जीव वाचवल्याची घटना घडली.

ठाण्यातील उपवन परिसरात पोलीस नाईक गजेंद्र सोनटक्के आणि पोलीस नाईक संतोष मोरे हे दोघे साधारण रात्री 7 च्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना 2 मुली त्यांच्याजवळ धावत आल्या आणि त्यांनी गजेंद्र सोनटक्के यांना थांबवून एक महिला उपवन तलावात उडी मारत आहे आणि ती आत्महत्या करणार आहे असं सांगितलं.

हे ऐकताच गजेंद्र यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्याआधीच महिलेनं उपवन तलावात उडी घेतली होती. त्या महिलेला पोहता येत नसल्यानं ती पाण्यात बुडू लागली. गजेंद्र यांना दुरूनच हे दिसलं. धावत येताना त्यानी थेट तलावात उडी मारली आणि महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु गजेंद्र सोनटक्के यांना ती महिला पकडून ठेवत असल्यानं गजेंद्र यांचाही जीव धोक्यात आला होता. तरीही गजेंद्र यांनी जीवाची बाजी लावत महिलेला वाचवलं आणि स्वत:ही सुखरूप बाहेर आले.

हा सर्व प्रकार घटनास्थळी असलेल्या ठाणेकरांनी कॅमेऱ्यात कैद केला. इतकंच नाही तर ते तलावातून बाहेर येताच सर्वांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like