जुगार अड्ड्यावर धाड ; भाजपच्या माजी महानगर जिल्हा अध्यक्षावर गुन्हा दाखल

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विशेष पोलीस पथकाने गोदामात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली असून या प्रकरणी भाजपच्या माजी महानगर जिल्हा अध्यक्षावर गुन्हा दाखल करुन त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील सटाणा नाका येथील एकता जिमखान्याला लागून असलेल्या गोदामात जुगार अड्डा सुरु असल्याच्या माहितीवरुन पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री ही कारवाई केली. त्यात जुगार खेळणाऱ्या २४ जणांना अटक केली आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल गायकवाड व त्यांच्या बंधुंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या भावास अटक करण्यात आली आहे.

या ठिकाणाहून जुगारात लावलेले १ लाख ९० हजार रुपयांची रोकड, १० दुचाकी, एक रिक्षा, २४ मोबाईल असा ७ लाख ८२ हजार ८९० रुपयांचा माल जप्त केला आहे.

विशेष पोलीस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या ठिकाणी नेहमीच राजरोसपणे जुगार खेळला जात होता. मात्र, आता आचारसंहितेमुळे पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याचे धाडस दाखविल्याचे बोलले जात आहे.