स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटिशांची चमचेगिरी केली : प्रियंका गांधी

पंजाबमधील भटिंडा येथील सभेत प्रियंका गांधी यांनी संघावर निशाणा साधला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्व देशात स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरु असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करण्यात मग्न होते, अशी जोरदार टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यातील प्रचारादरम्यान पंजाबमधल्या भटिंडा या ठिकाणी त्या बोलत होत्या.

प्रियांका म्हणाल्या की, जेव्हा पूर्ण पंजाब स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत लढत होता तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करत होते. संघाने कधीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजे अंतिम टप्यातील मतदान १९ तारखेला होणार आहे. त्यानंतर लगेच २३ मे रोजी निकाल लागणार आहे. या निकालादरम्यान काय होणार याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र त्याआधी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच झडल्या आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर निशाणा साधत आहेत. विरोधक म्हणजे महामिलावटी लोक आहेत अशी टीका मोदी करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते मोदींवर निशाणा साधत आहेत. अंतिम टप्यात पंजाब, बिहार, हिमाचलप्रदेश, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, मध्यप्रदेश या राज्याबरोबरच चंदिगढ या केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागेसाठी मतदान होणार आहे.